नवी दिल्ली, 6 मे : टायटॅनिक चित्रपटात कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथ ही भूमिका साकारणारे अभिनेते बर्नाड हिल यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 79 होते. बर्नाड हिल यांच्या निधनाची बातमी अभिनेत्री आणि त्यांची को-स्टार बार्बरा डिक्सन हिने दिली.
अत्यंत वेदनेने मी बर्नार्ड हिल यांच्या निधनाचे वृत्त सांगत आहे. बर्नाड हिल हे एक उत्तम अभिनेता होते. 1974 मध्ये विली रसेलच्या ‘जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट’ या शोमध्ये मी आणि बर्नार्ड हिल यांनी एकत्र काम केले होते. त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी एक प्रकारचा सन्मान होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना त्यांनी एक्स हँडलच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
दरम्यान, बर्नार्ड हिल यांच्या निधनावर त्यांच्या चाहत्यांनीदेखील दुःख व्यक्त केले आहे. बर्नार्ड यांनी टायटॅनिक या चित्रपटात कॅप्टन एडवर्ड स्मिथची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय त्यांनी ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मध्ये किंग थिओडेनची व्यक्तीरेखा साकारली होती.
तसेच हिल यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. 1983 च्या ‘बॉईज फ्रॉम द ब्लॅकस्टफ’ या मालिकेत त्यांनी काम केले होते आणि यासाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
