मुंबई, 31 ऑक्टोबर, (हिं. स.) : अभिनेता किशोर महाबोले आणि शेखर फडके मुंबई उपनगरातील प्रतिष्ठेचा ईशान्य मुंबई एक्स्लेंस अवॉर्डचे विजेते ठरले. दोन्ही पुरस्कार विजेत्यांचा सन्मान अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
हा सोहळा भांडुप येथे झाला. सोहळ्याचे आयोजन ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येते. हा कार्यक्रम तळेरे (जि. सिंधुदुर्ग) गावचे सुपुत्र अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून झाला. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॉ. विशाल कडणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमामध्ये अशोक सराफ यांनी पुरस्कार प्रदान करताना किशोर महाबोले आणि शेखर फडके या दोन्ही गुणी कलावंतांचे कौतुक केले आणि त्यांच्या सोबत चित्रीकरण केलेल्या मालिका आणि सिनेमांच्या आठवणींना उजाळा दिला. किशोर महाबोले सध्या आई कुठे काय करते मालिकेत, तर शेखर फडके नवा गाडी नवे राज्य या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचले आहेत.
हिंदुस्थान समाचार
