मुंबई, ८ डिसेंबर (हिं.स.) : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे गुरुवारी रात्री दोन वाजता मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ते गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे जवळचे मित्र सलीम काझी यांनी दुजोरा दिला आहे.
ज्युनियर मेहमूद या नावाने ते सिनेसृष्टीत प्रसिद्ध असले तरी त्यांचे मूळ नाव नईम सय्यद होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि एक नातू असा परिवार आहे. आज (शुक्रवार) दुपारच्या प्रार्थनेनंतर सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये त्यांनी ७ वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल २६५ चित्रपटांमध्ये काम केले असून सहा मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते. जौहर महमूद इन हॉन्ग कॉन्ग, गुरू और चेला, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमधून त्यांनी काम केले आहे. १९६८ मध्ये आलेल्या ब्रह्मचारी, १९७० मधील मेरा नाम जोकर, १९७७ मधल्या पर्वरिश आणि १९८० मधील दो और दो पांच यांसारख्या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली.
नुकतेच त्यांनी आपले मित्र जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांची भेट झाली होती आणि त्यांच्या भेटीचे फोटोही समोर आले होते. ज्यात ज्युनिअर मेहमूदची अवस्था पाहून जितेंद्रचे डोळे ओले झाले होते. जॉनी लिव्हरनेही त्यांची भेट घेऊन हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
शेवटची इच्छा
ज्युनियर मेहमुद आणि सचिन पिळगावकर यांनी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. या दोघांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. तसेच त्यांनी जितेंद्रसोबत ‘सुहाग रात’, ‘कारवाँ’, ‘सदा सुहागन’सह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. ज्युनियर मेहमूद यांनी शेवटची इच्छा सांगितली होती. ते म्हणाले होते, मी जग सोडून गेल्यावर लोकांनी मला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखावं. तुम्ही जग सोडून गेल्यावर चार लोकं तुम्हाला एक चांगला व्यक्ती म्हणून लक्षात ठेवत असतील तर तुमचं आयुष्य सार्थकी लागलं असं नक्कीच म्हणता येईल.
हिंदुस्थान समाचार
