सोलापूर, 10 जानेवारी, (हिं.स.) मोडनिंब येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडून बारा लाख ८० हजार ८०० रुपये लंपास केले. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. मध्यवर्ती ठिकाणी, मुख्य रस्त्यावर झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळच गाळ्यामध्ये एटीएम मशिन बसवलेली आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना हे एटीएम फोडल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी ताबडतोब मोडनिंब पोलिस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल आसिफ आतार यांना याबाबत कळविले.आतार यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत एटीएम मशिन फोडून चोरी झाल्याचे कळविले.
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पांढऱ्या रंगाच्या कारमधून २५ ते ३० वयाच्या चार व्यक्ती उतरल्याचे दिसत आहे.यानंतर त्यांनी कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन फोडली. मशिनमधील ड्रॉवरसह बारा लाख ८० हजार ८०० रुपये या चोरट्यांनी चोरून नेले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी शुभम कुमार,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पोलिस उपनिरीक्षक जोग यांनी भेट दिली. याबाबत किरण संजय लांडगे (रा. सोलापूर) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
