डोंबिवली, १० जानेवारी, (हिं.स) : दारू पीत असताना खुर्चीला धक्का लागल्याने रागाच्या भरात त्या तरुणावर पिस्तुलीने गोळी झाडल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या वेळी डोंबिवली पुर्वेकडील सेवन स्टार हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील सेवन स्टार हॉटेलमध्ये अजय सिंग व त्याचे चार मित्र दारू पीत बसले होते. बाजूच्या टेबलावर विकास भंडारी दारू पीत असताना खुर्चीला धक्का लागल्याने वाद सुरू झाला. वादामुळे झालेल्या हाणामारीत अजय सिंगने रागाच्या भरात आपल्या जवळील पिस्तुलाने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी विकासच्या खांद्याला लागल्याने हल्ल्यात तो बचावला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पकडले जाण्याच्या भीतीने अजय सिंग व त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अजय सिंग आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांसह पोलीस पथकाने दोन तासात अजय सिंग आणि त्याच्या चार साथीदाराला बेड्या ठोकून अटक केली.
हिंदुस्थान समाचार
