रायगड, 27 जानेवारी, (हिं.स.)। नेरळ, कर्जत व खालापूर परिसरात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी करून वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण करणाऱ्या टोळीला रायगड पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १० लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १३ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील मौजे दामोते येथे डिस्कव्हरी रिसर्च समोरील रस्त्यालगत नदीच्या बाजूस असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील विद्युत तारा तोडून तांब्याच्या तारा चोरण्यात आल्या होत्या. या चोरीदरम्यान ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल जमिनीवर सांडून मोठे नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५/२०२६ बीएनएस २०२३ चे कलम ३०२, ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
माननीय पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजीत शिवतरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ व कर्जत पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्त तपास पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी नेरळ–कर्जत–बदलापूर रोडवर संशयित पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी वॅगनआर (MH-43 CE 8405) कार अडवून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी नेरळ, कर्जत, खालापूर व खोपोली परिसरात डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे ४५० किलो वजनाच्या ४ लाख ५ हजार रुपये किमतीच्या विद्युत तारांसह चोरीसाठी वापरलेली ६ लाख रुपये किमतीची वॅगनआर कार असा एकूण १० लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रायगड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके
