नाशिक, २९ नोव्हेंबर, (हिं.स) – आपल्या पत्नीचा छळ करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देत आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये आजीवन सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, की सिडकोतील राजविहार हॉटेलच्या – मागे राहणारा आरोपी प्रकाश काशीनाथ पाटोळे (वय ३७) हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत असे. याअंतर्गत दि. १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळच्या वेळेस झालेल्या भांडणात आरोपी पत्नीचे तोंड दाबून तिच्यावर रॉकेल व पेटती काडी टाकून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता.त्याचा पुढील तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. एन. गावित यांनी करून खटला कोर्टात पाठविला.
या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांच्या कोर्टात चालले. न्यायालयाने आरोपीस परिस्थितीजन्य पुराव्यानुसार भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये आजीवन सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यांत सरकारी अभियोक्ता रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिले. गुन्हा शाबित होऊन आरोपीस शिक्षा लागण्याइतका योग्य तपास केल्याबद्दल संबंधित पोलीस उपनिरीक्षक, पैरवी अधिकारी व अन्य संबंधितांचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
हिंदुस्थान समाचार
