नाशिक, १४ नोव्हेंबर, (हिं.स.) :-शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तीन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनयभंगाचा पहिला प्रकार सातपूर येथे घडला. फिर्यादी व त्यांचे सासरे यांच्याशी आरोपी सुमनबाई भंदुरे, रोहिणी सचिन भंदुरे, शांताराम सावळीराम भंदुरे व सचिन शांताराम भंदुरे (सर्व रा. गोरक्षनाथ रोड, सातपूर) यांनी संगनमत करून सामाईक विहिरीच्या पाणी वापरावरून असलेल्या वादाच्या कारणावरून कुरापत काढली. त्यातून आरोपींनी फिर्यादी व त्यांचे सासरे यांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आला आहे.
विनयभंगाचा दुसरा प्रकार वुटवडनगर येथे घडला. आरोपी सूरज त्रिपुरारी सिंग व त्याचा मित्र याने संगनमत करून पीडित अल्पवयीन मुलगी ही खुटवडनगर येथे असताना स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून मुलीचा विनयभंग केला. याचा जाब पीडितेच्या मामाने सिंग व त्याच्या मित्राला विचारला. त्याचा राग आल्याने आरोपींनी पीडितेच्या मामाला शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून कशाने तरी मारून दुखापत केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे करीत आहेत.
विनयभंगाचा तिसरा प्रकार शेवगेदारणा येथे घडला. आपसातील नात्यातील वादाच्या कारणावरून कुरापत काढून आरोपी धनंजय त्र्यंबक पाळदे, प्रवीण निवृत्ती कासार व निवृत्ती कासार (सर्व रा. शेवगेदारणा, ता. जि. नाशिक) यांनी संगनमत करून पीडित •. फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आडके करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
