पुणे 14 जानेवारी (हिं.स.) एका साप्ताहिकाचा व डिजिटल वेबसाईटचा संपादक व पत्रकार असल्याची बतावणी करून लष्कर परिसरातील एका व्यावसायिकाकडून दरमहा हप्ता मागणाऱ्या तीन जणांविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भूषण साळवे (४५), संदीप रासकर (वय ४३), अक्षय वाघमारे (३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत राजेश श्रीगीरी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भुषण साळवे याने फिर्यादी राजेश श्रीगीरी यांना फोन करून पत्रकार असल्याचे सांगितले. तुम्ही बालाजी सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्यांचा क्लब चालविता तसेच तुम्ही अवैध धंदे देखील करत आहेत. मला हप्ते सुरु करा, नाहीतर मी तुमच्या क्लबबद्दल वर्तमानपत्रात बातम्या छापेल. तसेच पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्ह्यात अडकविण्याची धमकी भुषण सावळे याने श्रीगीरी यांना दिली. माझा सहकारी संदीप रासकरच्या मोबाईल नंबरवर दर महिन्याला 3 हजार रूपये द्यावे लागतील, असे धमकावत दोन महिन्यांचे 6 हजार रूपये त्याने घेतले. त्यानंतर अक्षय वाघमारेने श्रीगीरी यांना प्रत्यक्ष भेटून स्वतः पत्रकार असल्याचे सांगुन श्रीगीरी यांच्याकडे दर महिन्याला हप्ता स्वरूपात पैशाची मागणी केली. त्यामुळे सदर गन्हा दाखल करण्यात आला आहे.
.हिंदुस्थान समाचार
