रत्नागिरी, अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात वाटूळ दाभोळे मार्गावर लांजा तालुक्यातील भांबेड येथे घडला.
काल रात्री १२.२१ वाजता या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद सयाजी बुधाजी जाधव (५३ वर्षे, राहणार पांगरी खुर्द, राजापूर) यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सयाजी जाधव यांचा मुलगा सिद्धांत सयाजी जाधव (२६, रा. पांगरी खुर्द, राजापूर) त्याचा मित्र प्रशांत बागवे याला लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आपल्या दुचाकीने (एमएच ०८ टी ३६५९) गेला होता. मित्राला सोडण्यासाठी जात असल्याने घरी यायला उशीर होईल, असे त्याने घरच्यांना सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने सिद्धांतचा संकेत याने त्याच्या मोबाइलवर रात्री १२.१५ फोन केला असता त्याचा मोबाइल पोलिसांनी उचलून त्याचा अपघात झाल्याचे त्याला सांगितले.
त्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा पोलिसांचा कयास आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सिद्धांतच्या डोक्याला तसेच पायाला गंभीर दुखापती झाल्याने त्याला प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
