रत्नागिरी, 12 फेब्रुवारी: भांबेड (ता. लांजा) येथे पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून दुचाकीने पलायन करणाऱ्या दोघा अज्ञात चोरट्यांविरूद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाटूळ-दाभोळे मार्गावर भांबेड पवारवाडी येथे घडलेल्या या घटनेची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात आज देण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नम्रता चंद्रकांत कोकाटे (५३, रा. वळणवाडी, भांबेड) त्यांच्या मुलीची सासू शारदा बागवे यांच्याकडे वाटूळहून दाभोळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत जात होत्या. भांबेडच्या पवारवाडीतील जयराम पवार यांच्या घरासमोर त्या आल्या असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेले दोघेजण रस्त्याच्या एका बाजूला उभे होते. त्यातील एका अज्ञात इसमाने कोकाटे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून चोरून नेले, तर दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे दोघेही चोरटे दुचाकीवरून भांबेडच्या दिशेने पळून गेले.
