सिंधुदुर्ग, 8 डिसेंबर (हिं.स.) : तत्कालीन तहसीलदार दोडामार्ग तथा निवडणुक नायब तहसीलदार संजय दत्ताराम कर्पे यांच्या शासकीय दालनात घुसून त्यांच्याशी वादविडाद करणे, शिवीगाळ करणे, धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी दोघांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. बाबुराव दत्ताराम धुरी, वय- 45 रा. भिकेकोनाळ, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग आणि सुभाष ऊर्फ बबलु सुरेश पांगम, वय -40 रा. आयी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत हकीकत अशी, तत्कालीन तहसीलदार दोडामार्ग तथा निवडणुक नायब तहसीलदार संजय दत्ताराम कर्पे १६ डिसेंबर २०४८ रोजी त्यांच्या शासकीय दालनामध्ये कुडासे गावातील उपोषणाबाबत इतर अधिकारी यांचेशी चर्चा करीत असताना आरोपी बाबुराव दत्ताराम धुरी, वय- 45 रा. भिकेकोनाळ, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग,सुभाष ऊर्फ बबलु सुरेश पांगम, वय -40 रा. आयी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग यांनी त्यांची कोणतीही परवानगी न घेता शासकीय दालनात प्रवेश केला व दोन्ही आरोपींनी नायब तहसीलदार कर्पे यांच्याशी वादविवाद, शिवीगाळी करुन तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी देवुन शासकीय कामात अडथळा आणला होता.
त्याबाबत नायब तहसीलदार कर्पे यांनी दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या तक्रारी वरुन दोडामार्ग पोलीस ठाणे गुरनं 123/2018 भा.द.वि.कलम 353,332,341,504, 506,34 या प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्हयाचा तपास हा तत्कालीन तपासी अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ देसाई यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते.
सदर केसची सुनावणी जिल्हा न्यायाधीश -2 व सहाय्यक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग व्ही. एस. देशमुख यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यामध्ये आज रोजी वरील दोन्ही आरोपींना शासकीय अधिकाऱ्यास शिवीगाळी केल्याप्रकरणी भा.दं.वि कलम 504 अंतर्गत दोषी धरुन प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्याचे न्यायालयातील कामकाज जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. संदीप राणे यांनी पाहिले.
हिंदुस्थान समाचार
