वाशीम , 9 जुलै (हिं.स.)।वाशिम जिल्ह्यातील अकोला- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव टोलप्लाझा येथे मंगळवारी (दि.८) मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी टोलप्लाझा मॅनेजरच्या तक्रारीवरून मनसेच्या तिन कार्यकर्त्यांविरोधात वाशिमच्या ग्रामीण पोलिसात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तोंडगाव टोल नाक्यावर योग्य सुविधा नसल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या विरोधात काही कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली. दरम्यान या प्रकारानंतर टोल नाक्यावरील व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलीसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला असून या प्रकरणातील तीन जणांची नावं पुढे आली आहेत. यात मनसेच्या वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे, मनसे वाहतूक शहराध्यक्ष उमेश डोलमारे आणि सिताराम चव्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांकडून तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी टोल मॅनेजरच्या तक्रारीवरून मॅनेजरकडून ५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच टोल प्लाझावर मोठ्या प्रमाणात तोडफोड करून आर्थिक नुकसान केल्याची तक्रार वाशिमच्या ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीही तोडफोड करणाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याचे सुद्धा तक्रारीत नमूद आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
