नाशिक, ७ जानेवारी, (हिं.स.) : पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्याने आणि तशी विक्री केलेल्या सुमारे 42 जणांना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.
येत्या १५ जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांत सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नागरीकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारीक मांजाऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधीत मांजाची विक्री काही इसमांकडून केली जात असल्याचे पोलिसांना यापुर्वी आढळून आले आहे. या मांजामुळे पशुपक्षी मानव यांना मृत्यूला समोर जावे लागले आहे. तर, काही ठिकाणी म्हणजे अडकल्यामुळे आग लागल्याच्या घटना देखील झाल्या आहेत.
या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त. संदिप कर्णिक यांनी कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त . किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, यांचे सुचनेप्रमाणे परिमंडळ १ व २ मधील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण ४२ आरोपीतांवर हद्दपरीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागात नितीन जाधव यांनी ०७ इसमांवर, सरकार वाडा विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी २३ इसमांवर, अंबड विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, यांनी ०६ इसमांवर व नाशिक रोड विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त . आनंदा वाघ, यांनी ०६ व्यक्तींवर ही कारवाई केली आहे.
तरी, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधीत नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त, किरणकुमार चव्हाण तसेच परिमंडळ २ च्या पोलीस उप आयुक्त, मोनिका राऊत यांनी केले असून प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हिंदुस्थान समाचार
