पालघर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
जनावरांच्या अवैध वाहतुकीवर तारापूर पोलिसांनी धडक कारवाई करत १४ म्हशींच्या वासरांची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
११ ऑगस्ट रोजी रात्री वाणगाव–पाचमार्ग रस्त्यावर अवैध जनावर वाहतूक होणार असल्याची माहिती ठाण्याचे प्रभारी अधिकारी निवास कणसे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक यतीस देशमुख आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अक्करपट्टी येथे सापळा रचण्यात आला.
रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये म्हशींच्या १४ वासरांची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळले. कल्याण येथील नसीम हाजी शेख आणि वसई येथील राकेश विजय राऊत यांना ताब्यात घेऊन प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका केलेल्या सर्व जनावरांना मान येथील गोशाळेत हलविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL
