डोंबिवली, ९ नोव्हेंबर (हिं.स.) : लोकलवर एका माथेफिरुने दगडफेक केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने एकाला अटक केली आहे. शरद महादेवराव गांगुर्डे (३८) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. या दगडफेकीत लोकलच्या खिडकीची काच फुटली असून सुदैवाने यात कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. याबाबत प्रवाशांनी रेल्वेला तक्रार केल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. याच परिसरातुन एका संशयिताला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने दगडफेक का केली हे चौकशीअंती समजून येईल.
अनेकदा धावत्या रेल्वेवर दगडफेक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यात प्रवाशी जखमी देखील झाले आहेत. मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एसी लोकल ट्रेनवर एकाने दगडफेक केल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. जास्त करून मुंब्रा किंवा मुंब्रा बोगद्यानंतर अशा रेल्वेवर दगड आणि काठ्या मारण्याचे प्रकार झालेले आहेत, असे डोंबिवली रेल्वे स्थानकावरील काही प्रवाशांकडून सांगण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
