डोंबिवली, १ डिसेंबर (हिं.स.) : सोन्याचे दागिने बनविणे तसेच सोन्याचे दागिने गहाण ठेवणे अशी फसवेगिरी करीत सुमारे साडे पंधरा लाखाची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. सोन्याचे दुकान असलेल्या कमल ज्वेलर्सचा मालक बजरंग दास याच्या विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ज्वेलर्सचा मालकाचा शोध घेण्यासाठी राजस्थानला गेले होते. मात्र दासचा शोध लागला नाही. नेहमीप्रमाणे पोलीस तपास करीत असले तरी तपासात दिरंगाई नको म्हणून आता कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे समोर येत आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश नारायण भोईर यांच्या तक्रारीनुसार कमल ज्वेलर्सचा मालक बजरंग दास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेला घनश्याम गुप्ते रोडवरील जयहिंद कॉलिनीमध्ये दास यांचे कमल ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भोईर यांची बजरंग दास यांच्याबरोबर ओळख झाल्यावर ते ज्वेलर्स दुकानात येत असत. भोईर यांनी बजरंग दास याच्याकडे ६.५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून ८० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर सोन्याचे मंगळसूत्र ४.५ तोळ्याचे १० जून २०२२ रोजी बजरंग दास याच्या दुकानात देऊन त्याबदल्यात मला १ लाख रुपये दिले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा २ तोळे सोने गहाण ठेवून बारा हजार रुपये घेतले होते. त्यानंतर गहाण ठेवलेले दागिने परत घेण्यासाठी ३ एप्रिल २०२३ रोजी भोईर हे गेले असता कमल ज्वेलर्स दुकान बंद असल्याचे दिसले. भोईर यांनी दास यास अनेक वेळेला फोन केला पण त्याचा फोन बंद होता. दास याने अशा प्रकारे अनेकांना दागिने बनवून दिले नाहीच, तर गहाण ठेवेलेले दागिने परत केले नाही अशीही माहिती उघड होत आहे.
त्यानंतर दासच्या राहत्या घराजवळ चौकशी केली असता खूप दिवसापासून बंद असल्याचे समजले. दास यांनी अनेकांची फसवणूक सुमारे १५ लाख ८० हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस दासचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वपोनि मोहन खांदारे यांना विचारले असता, दास याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके राजस्थानला गेली होती मात्र काही हाती लागले नाही. पोलीस दासचा शोध घेत आहेत.
याबाबत प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव संतोष केणे यांनी याप्रकरणी खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. डोंबिवलीतील कमल ज्वेलर्स दुकानदार बजरंग दास याने अनेकांना फसवणूक केली आहे. डोंबिवलीतून हा दास याने पोबारा केला असून २२ एप्रिल २०२३ रोजी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या तपासाला वेग आला नसल्याने या नागरिकांनी सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर दास विरोधात २७ जुलै २०२३ रोजी तक्रार दाखल केली होती.
हिंदुस्थान समाचार
