रायगड, 22 फेब्रुवारी (हिं.स.)। माणगाव तालुक्यात खंडणी मागणी व मारहाणीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास मौजे नाणोरे गावाच्या हद्दीत असलेल्या L.N.A. Infa Project Private Limited येथे ही घटना घडली.
फिर्यादी हे खर्डी येथील ग्रीन सिटी फ्लॅट नं. 102 येथे राहणारे असून ते संबंधित कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एकटे बसले असताना आरोपी व त्याच्या सोबत 9 ते 10 इसम विनापरवाना आत घुसल्याचा आरोप आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर बायपास ते माणगाव बायपास या कामासाठी तसेच खर्डी क्रशरसाठी ब्लास्टिंग सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात महिन्याला खंडणी देण्याची मागणी आरोपींकडून करण्यात आली.
फिर्यादी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी व त्यांच्या साथीदारांनी कार्यालयात तसेच कार्यालयाबाहेर शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. झटापटीदरम्यान फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे 8 तोळे वजनाची सोन्याची चैन तसेच शर्टच्या वरच्या खिशातील 20 हजार रुपये गहाळ झाल्याची नोंद आहे.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 52/2026 अन्वये भारतीय दंड विधान कलम 308 सह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि/सुर्वे करीत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके
