जळगाव, 21 जानेवारी (हिं.स.) जागतिक बाजारातील वाढती अनिश्चितता तसेच भू-राजकीय तणावाचा परिणाम थेट भारतीय सराफा बाजारावर जाणवत आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात गुंतवणूकदारांचा ओढा सोन्या-चांदीकडे वाढल्याने दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. परिणामी, सर्वसामान्य खरेदीदारांची चिंता अधिक वाढली आहे. आज बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याच्या किमतीत प्रति तोळा तब्बल ५ हजार रुपयांची वाढ झाली असून, त्यामुळे सोन्याने दीड लाखांचा आकडा पार केला आहे. याचबरोबर चांदीच्या दरातही वाढीचा सिलसिला कायम असून आज चांदीही प्रतिकिलो ५ हजार रुपयांनी महागली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ५ हजार २० रुपयांची वाढ झाली असून, एक तोळा सोने १ लाख ५४ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४ हजार १६ रुपयांनी वाढून १ लाख २३ हजार ८४० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ४ हजार ६०० रुपयांनी वाढून १ लाख ४१ हजार ९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे दर ३ हजार ६८० रुपयांनी वाढले आहेत. १८ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति तोळा ३ हजार ७७० रुपयांची वाढ झाली असून, ८ ग्रॅम सोन्याचे दर ३ हजार १६ रुपयांनी वाढून ९२ हजार ८८८ रुपये झाले आहेत. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. आज प्रतिकिलो चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ झाली असून, एक किलो चांदीचा भाव ३ लाख २५ हजार रुपयांवर गेला आहे. जळगाव सराफ बाजारात चांदीच्या दराने विक्रम मोडले आहेत. मंगळवारी एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल १७ हजार रुपयांची वाढ झाली. जळगावच्या सुवर्ण बाजाराच्या इतिहासातील ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. सोमवारीही चांदीच्या दरात १० हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चांदीच्या दरात एकूण २७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर
