मुंबई, 6 ऑगस्ट (हिं.स.)। एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतात आपले पाय अधिक भक्कम करत गुरुग्राममध्ये जवळपास ५१,००० चौ.फुट व्यावसायिक जागा नऊ वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. यासाठी मासिक ४० लाख भाडे ठरवण्यात आले आहे.
मागील महिन्यात मुंबईत पहिला व्यावसायिक प्रकल्प सुरू केल्यानंतर, टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ने गुरुग्रामच्या सोहना रोडवरील ऑर्चिड बिझनेस पार्क येथे ही जागा घेतली आहे. या जागेचा करार १५ जुलै २०२५ पासून सुरू झाला असून २८ जुलै रोजी नोंदणी करण्यात आली आहे.
या व्यावसायिक जागेचा चार्जेबल एरिया ३३,४७५ चौ.फुट असून, ही जागा सेवा केंद्र (सर्व्हिस सेंटर), गोदाम आणि किरकोळ विक्री केंद्र (रिटेल आउटलेट) म्हणून वापरण्यात येणार आहे. या दुसऱ्या व्यावसायिक जागेचे प्रारंभिक भाडे १२० प्रति चौ.फुट असून, दरवर्षी ४.७५% दराने वाढ होणार आहे.
टेस्ला-गुरुग्राम कराराचे तपशील:
पहिल्या वर्षाचे भाडे: ४०.१७ लाख, दुसरे वर्ष: ४२.०७ लाख, तिसरे वर्ष: ४४.०७ लाख, चौथे वर्ष: ४६.१७ लाख, पाचवे वर्ष: ४८.३६ लाख, सहावे वर्ष: ५०.६६ लाख, सातवे वर्ष: ५३.०६ लाख, आठवे वर्ष: ५५.५८ लाख, नववे वर्ष: ५८.२२ लाख दस्तऐवजांनुसार, या मालमत्तेतील जमीन मालकीचे वितरण पुढील प्रमाणे आहे:
सनसिटी रिअल इस्टेट एलएलपी – २१ टक्के , ऑर्किड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड – ३.०६ टक्के, गरवाल प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड – ७५.९४ टक्के आहे.
भाडे प्रत्येक महिन्याच्या सातव्या तारखेपूर्वी भरायचे आहे. या ठिकाणी ५१ वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. टेस्लाने या नऊ वर्षांच्या भाडेकरारासाठी २.४१ कोटींची सुरक्षा ठेव जमा केली आहे.
दिल्लीतील शोरूम लवकरच
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला ११ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील एरोसिटी येथील वर्ल्डमार्क मॉलमध्ये नवीन शोरूम सुरू करणार आहे.
मुंबईतील पहिला करार
गेल्या महिन्यात टेस्लाने मुंबईतील कुर्ला परिसरात लोढा लॉजिस्टिक्स पार्क येथे २४,५६५ चौ.फुट जागा गोदामासाठी भाड्याने घेतली होती. या पाच वर्षांच्या करारासाठी एकूण २४.३८ कोटी भाडे ठरवले गेले होते.
टेस्ला किंवा गरवाल प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून या व्यवहारावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
