मुंबई, 4 ऑगस्ट (हिं.स.)। एचसीएल टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सी. विजयकुमार हे २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वाधिक पगार घेणारे भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख ठरले आहेत. त्यांना एकूण ९४.६ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
या पॅकेजमध्ये १५.८ कोटींचा मूळ पगार, १३.९ कोटींचा परफॉर्मन्स लिंक्ड बोनस, ५६.९ कोटींचे दीर्घकालीन प्रतिबंधित स्टॉक युनिट्स आणि ₹१.७ कोटींचा अतिरिक्त बोनस यांचा समावेश आहे. त्यांच्या पगारात यंदा ७.९% वाढ झाली असून, हा पगार कंपनीतील सरासरी कर्मचाऱ्याच्या पगाराच्या तब्बल ६६२.५ पट आहे.
इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे पॅकेज ८०.६ कोटी आहे. टेक महिंद्राचे मोहित जोशी ( ५३.९ कोटी), विप्रोचे श्रीनी पल्लिया (५३.६ कोटी) आणि टीसीएसचे के. कृती वासन ( २६.५ कोटी) यांचा क्रमशः पुढील क्रमांकावर आहेत.
एचसीएल टेकच्या संचालक मंडळाने विजयकुमार यांचा कार्यकाळ वाढवून त्यांची नियुक्ती ३१ मार्च २०३० पर्यंत कायम ठेवली आहे. त्यांनी २०१६ मध्ये सीईओ आणि २०२१ मध्ये एमडी म्हणून पदभार स्वीकारला होता.
वाढती कामगिरी, जागतिक विस्तार
त्यांच्या नेतृत्वाखाली एचसीएल टेकने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे उत्पन्न ८.३३% वाढून १,०९,९१३ कोटींवर पोहोचले, तर निव्वळ नफा ६% वाढून १५,७१० कोटी झाला. प्रति शेअर कमाईही ५४.८५ वरून ५७.९९ इतकी झाली.
सी. विजयकुमार यांचा प्रवास
१९६७ मध्ये कोइम्बतूर, तामिळनाडू येथे जन्मलेले विजयकुमार यांनी पी.एस.जी. कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. ते सध्या पत्नी वनिता आणि मुलगी दिव्यासह अमेरिकेतील न्यूजर्सी येथे वास्तव्यास आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
