मुंबई, 5 सप्टेंबर (हिं.स.)। युपीएल ग्रुपच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या युपीएल सस्टेनेबल टेक्नॉलॉजी विद्यापीठाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सोमरव्हिले येथील ऑक्सफर्ड इंडिया सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (ओआयसीएसडी) सोबत शाश्वत अन्न प्रणाली आणि हवामान बदल या क्षेत्रातील ज्ञानविनिमयाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण, अभ्यासक्रम विकास आणि जागतिक दर्जाच्या संशोधनाशी थेट जोडले जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या करारानुसार, युपीएल विद्यापीठातील प्राध्यापक दरवर्षी ऑक्सफर्डमध्ये विशेष प्रशिक्षण घेतील, तर ओआयसीएसडीचे तज्ज्ञ युपीएलच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास, हवामान कृती आणि तांत्रिक नवोन्मेष यांसारख्या विषयांवरील व्याख्यान मालिका घेतील. आगामी शैक्षणिक वर्षात दोन प्रत्यक्ष आणि दोन ऑनलाइन व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
युपीएल लिमिटेडचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ जय श्रॉफ यांनी ही भागीदारी जागतिक शाश्वततेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षण आणि नवोन्मेषाचे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. ओआयसीएसडीच्या कार्यकारी संचालक आणि सोमरव्हिले महाविद्यालयाच्या प्राचार्या बॅरोनेस जान रॉयल यांनी हवामान-लवचिक शेती, नवोन्मेष आणि पर्यावरणीय संवर्धन या क्षेत्रांत प्रगतीसाठी हे सहकार्य महत्त्वाचे ठरेल, असे मत व्यक्त केले. युपीएल विद्यापीठाचे अध्यक्ष अशोक पंजवानी यांनी या करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक चर्चेत सहभाग घेण्याची आणि शाश्वत उपाय शोधण्याची प्रेरणा मिळेल, असे सांगितले.
युपीएल आणि ओआयसीएसडी यांचे सहकार्य 2021 मध्ये ओपनअॅग सिम्पोझियमपासून सुरू झाले होते. या सिम्पोझियममध्ये हवामान बदल आणि शेती या विषयांवर धोरणकर्ते, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होतात. 18 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या चौथ्या आवृत्तीला सिएरा लिओनचे राष्ट्रपती डॉ. ज्युलियस मादा बियो प्रमुख पाहुणे होते.
युपीएल विद्यापीठाने यापूर्वीही शाश्वतता, पर्यावरणीय अनुपालन, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि प्रोसेस इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रांत विविध सहकार्य करार केले आहेत. या सर्व उपक्रमांतून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि जागतिक दृष्टिकोन उपलब्ध करून देण्याची बांधिलकी अधोरेखित केली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
