मुंबई, 24 ऑगस्ट (हिं.स.)। मारुती सुझुकी भारतीय वाहन बाजारपेठेत आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी सातत्याने नवीन मॉडेल्स सादर करत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने ३ सप्टेंबर २०२५ रोजी एक नवी एसयूव्ही लाँच करण्याची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे ही कार एरिना डीलरशिप नेटवर्कद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणार असून ती मारुतीच्या विद्यमान ब्रेझाच्या वरच्या आणि ग्रँड विटाराच्या खालच्या पोझिशनवर बसवली जाईल. त्यामुळे मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये या कारची सरळ स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन तैगुन आणि टोयोटा हायराइडर यांसारख्या लोकप्रिय गाड्यांशी होणार आहे.
या कारसंबंधीचे अधिकृत तांत्रिक तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाहीत, मात्र 1.5-लीटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय हायब्रिड आणि सीएनजी व्हर्जन देखील आणले जाऊ शकते. त्यामुळे अधिक मायलेज आणि कमी रनिंग कॉस्टची अपेक्षा ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी ही एसयूव्ही आकर्षण ठरू शकते.
डिझाइन आणि पोझिशनिंगच्या दृष्टीने ही कार एरिनाची फ्लॅगशिप असेल. ती ब्रेझापेक्षा मोठी आणि अधिक प्रीमियम अनुभव देणारी असू शकते , तर दुसरीकडे किंमती आणि फीचर्सच्या बाबतीत ग्रँड व्हिटाराच्या खालच्या श्रेणीत ठेवली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात अधिक फीचर्स आणि स्पेस असलेली कार मिळण्याचा फायदा होईल.
मारुती सुझुकीकडे आधीच एंट्री-लेव्हलपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत विविध एसयूव्ही मॉडेल्स उपलब्ध आहेत. नव्या एसयूव्हीच्या आगमनाने कंपनीची उत्पादन श्रेणी आणखी मजबूत होईल आणि वाढत्या स्पर्धात्मक मिड-साइज एसयूव्ही बाजारपेठेत अधिक हिस्सा मिळवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना चालना मिळेल.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
