मुंबई , 28 जुलै (हिं.स.)। भारतातील दुचाकी क्षेत्रात कधी काळी अग्रगण्य ठरलेली काइनेटिक मोटर्स आता पूर्णपणे नवीन आणि इलेक्ट्रिक स्वरूपात पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. कायनेटिक डीएक्स ईव्ही नावाची ही नवकोरी इलेक्ट्रिक स्कूटर रेट्रो लुक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम घेऊन बाजारात आली असून, या स्कूटरची एक्स-शोरूम (पुणे) किंमत ₹1,11,499 (डीएक्स) आणि ₹1,17,499 (डीएक्स प्लस ) इतकी आहे.
बुकिंगसाठी ग्राहकांना फक्त ₹1,000 भरावे लागणार असून सप्टेंबर 2025 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ 35,000 युनिट्स उपलब्ध असतील, अशी माहिती कंपनीने दिली.
रेट्रो डिझाईनला आधुनिक स्पर्श
नवीन डीएक्स स्कूटरचे डिझाईन इटालियन डिझायनर्सच्या सहकार्याने करण्यात आले असून, त्यात पारंपरिक रचना आणि इलेक्ट्रिक ओळख यांचा समतोल साधण्यात आला आहे. तीन पट्ट्यांचा फ्रंट ग्रिल, मेटल साइड बॉडी आणि व्हायझरवरील प्रकाशित काइनेटिक ब्रँडिंग यामुळे स्कूटर आकर्षक दिसते.
डीएक्स प्लस पाच रंगांमध्ये (लाल, निळा, पांढरा, सिल्व्हर, काळा) तर डीएक्स फक्त दोन रंगांमध्ये (सिल्व्हर आणि काळा) उपलब्ध आहे. यासोबत 37 लिटर अंडर-सीट स्टोरेज, मजबूत मेटल बॉडी आणि रुंद फ्लोअरबोर्डसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
दमदार परफॉर्मन्स, लांब रेंज
ही स्कूटर 4.8kW बीएलडीसी हब मोटरने सुसज्ज असून ती 90 किमी/ता टॉप स्पीड देते. 4.6kWh LFP बॅटरी रेंज -X या कंपनीने विकसित केली असून ती तब्बल 3,500 चार्ज सायकल्स देते.
IDC सर्टिफाईड 116 किमी रेंज असलेल्या डीएक्स व्यतिरिक्त डीएक्स+ मध्ये क्रूझ लॉक टेक्नॉलॉजी देण्यात आली असून ती 150 किमीपर्यंत रेंज देते (25–30 किमी/ता वेगात). हिल होल्ड, रिव्हर्स मोड, 22 अंश चढाईची क्षमता, तसेच रेंज, पॉवर आणि टर्बो असे तीन राईडिंग मोड्स यामध्ये आहेत.
स्मार्ट कनेक्टिव्हिटी व सुरक्षा
डीएक्स प्लस मध्ये ‘टेलीकिनेटिक्स’ नावाचा सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीचा संपूर्ण संच दिला आहे, ज्यामध्ये:
अँटी-थेफ्ट अलर्ट , जीपीएस ट्रॅकिंग, जिओ-फेन्सिंग, रिमोट लॉक/अनलॉक, फाइंड माय काइनेटिक , FOTA अपडेट्स, गाईड-मी-होम हेडलॅम्प्स , राईड अॅनालिटिक्स याशिवाय माय काईनी कम्पॅनियन नावाचा व्हॉईस असिस्टंट देखील यात आहे, जो 16 भारतीय भाषांमध्ये कार्य करतो आणि स्कूटर संबंधित विविध इव्हेंट्ससाठी राइडरला अलर्ट देतो. तो वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो!
अतिरिक्त वैशिष्ट्ये
8.8-इंच डिजिटल डिस्प्ले, ब्लूटूथ, म्युझिक प्लेयर, वॉइस नेव्हिगेशन , कायनेटिक असिस्ट बटणद्वारे थेट ग्राहक सेवा , ईझी की (कीलेस अॅक्सेस), ईझी चार्ज (डीएक्स प्लस साठी – पेटंटेड रिट्रॅक्टेबल चार्जर),ईझी फ्लिप (पिलियन फुटरेस्ट एका टचवर उघडतो)
मजबूत वॉरंटी आणि उत्पादन व्यवस्था
काइनेटिक डीएक्स ला 3 वर्षे/30,000 किमी वॉरंटी मिळते, जी वाढवून 9 वर्षे/1 लाख किमी पर्यंत करता येते. ही भारतातील ईव्ही क्षेत्रातील सर्वाधिक वॉरंटींपैकी एक आहे.
या स्कूटरचे उत्पादन कायनेटिक वॅट्स अँड व्होल्ट्स लिमिटेड या कंपनीच्या 87,000 चौरस फूट क्षेत्रातील प्लांटमध्ये होते. कंपनीने आतापर्यंत ₹72 कोटींची भांडवली गुंतवणूक केली असून, प्रवर्तकांनी आणखी ₹177 कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
