पुणे, 6 ऑक्टोबर, (हिं.स) राज्यातील सरकारी शाळांप्रमाणेच आता सर्व खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य सरकारने जिल्हा परिषद, महापालिकेसह अनुदानित शाळांचा या चाचणीसाठी समावेश केला आहे.
शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम यांचे बळकटीकरण ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यात उच्च प्राथमिक शाळांचा विचार करता सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांएवढेच खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी या सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या पातळीत वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या चाचण्या केवळ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घेतल्यास खासगी अनुदानित शाळांमधील निम्मे विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहतील. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीही संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि दोन आयोजित करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
हिंदुस्थान समाचार
