मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी १२४ व्या क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीची (ZRUCC) बैठक मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील सभागृहात घेतली. अरविंद सावंत, खासदार (लोकसभा), मुंबई (दक्षिण) मतदारसंघ, धनंजय महाडिक, खासदार (राज्यसभा), कोल्हापूर (दक्षिण) मतदारसंघ आणि डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, सोलापूर (लोकसभा) मतदारसंघाचे खासदार हे क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीच्या (ZRUCC) ३९ सदस्यांसह उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करताना नरेश लालवानी म्हणाले की, क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीची (ZRUCC) सदस्यांच्या सूचनांना महत्त्व आहे आणि रेल्वेला प्रवाशांसाठी तिची सेवा अधिक चांगली करण्यास मदत होते. लालवानी म्हणाले की, मध्य रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात भाडे-व्यतिरीक्त (नॉन-फेअर) महसूल आणि तिकीट तपासणी महसूलाच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, मध्य रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८१.८४ दशलक्ष टन विक्रमी मालवाहतूक नोंदवली आहे आणि २०२३-२४ या वर्षात आतापर्यंत ३५.८८ दशलक्ष टनांचे उत्साहवर्धक लोडिंग नोंदवले आहे.
लालवानी म्हणाले की, २५८ किलोमीटर नवीन लाईन टाकणे आणि लाईनचे दुहेरीकरण आणि मल्टीट्रॅकिंग यासारख्या पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्षात ८ एस्केलेटर, ८ लिफ्ट जोडण्यात आल्या असून मध्य रेल्वेवर एकूण १७४ एस्केलेटर आणि १३७ लिफ्ट आहेत. मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात आणखी १८ एस्केलेटर आणि आणखी २५ लिफ्ट बसवण्याची योजना आखली आहे. अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत स्थानकांच्या पुनर्विकासाचा भाग म्हणून मध्य रेल्वे वर ९५ एस्केलेटर आणि ११४ लिफ्ट बसवण्याची योजना आहे.
सुरक्षेवर बोलताना लालवानी म्हणाले, ३११ डब्यांमध्ये १९२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षिततेच्या चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय वंदे भारत ट्रेन, डेमू (DEMU), मेमू (MEMU) आणि एलएचबी LHB) डब्यांच्या ३६४ डब्यांमध्ये २१३२ सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. ८१ ईएमयू (EMU) रेकच्या महिला डब्यांमध्ये यंत्रणा बसवण्यात आली आहे. ५९ स्थानकांवर वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स आणि उर्जेची बचत करण्यासाठी ९२ स्थानकांवर सौर पॅनेल सुरू करणे ही देखील मध्य रेल्वेची काही मोठी कामगिरी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीच्या (ZRUCC) सदस्यांनी रेल्वे वापरकर्त्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथ प्लॅटफॉर्मच्या विस्ताराच्या कामाची सद्यस्थिती, अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत कामे, उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा आणि नवीन गाड्यांसाठी डिमांड यासारख्या अपडेट्स घेतल्या आणि अनेक सूचना या बैठकीत मांडल्या. महाव्यवस्थापकांनी सदस्यांना आश्वासन दिले की, मध्य रेल्वेने सदस्यांच्या सूचनांचे परीक्षण केले आहे आणि त्यावर सविस्तर विचारविनिमय केल्यानंतर देण्यात आलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला मध्य रेल्वेचे प्रधान विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
