ढाका, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।तारिक रहमान बांग्लादेशचे नवे पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर रहमान यांनी देशात अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी लष्कराच्या उच्च स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. रहमान यांनी ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हफीजुर रहमान यांना भारतातून बांग्लादेशात परत बोलावले आहे. हफीजुर रहमान भारतातील बांग्लादेश उच्चायुक्तालयात संरक्षण सल्लागार म्हणून कार्यरत होते.
पंतप्रधान झाल्यानंतर काही दिवसांतच रहमान यांनी लष्कराच्या उच्च पातळीवर मोठे बदल केले. वृत्तानुसार, या बदलांचा परिणाम अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक कमांड्स तसेच बांग्लादेशच्या सर्वात मोठ्या लष्करी गुप्तचर संस्थेवर होणार आहे. तसेच पंतप्रधान रहमान यांनी भारतातील बांग्लादेश उच्चायुक्तालयात संरक्षण सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हफीजुर रहमान यांना मेजर जनरल पदावर पदोन्नती देत 55व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्त केले आहे.
आर्मी मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आलेले हे बदल रहमान यांच्या नव्या सरकारने 17 फेब्रुवारी रोजी सत्ता स्वीकारल्यानंतर काही दिवसांत करण्यात आले.बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळवले. रहमान यांनी 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानंतर मोहम्मद युनूस यांचे 18 महिन्यांचे शासन संपुष्टात आले.
लेफ्टनंट जनरल एम. मनुर रहमान, जे यापूर्वी आर्मी ट्रेनिंग अँड डॉक्ट्रिन कमांड (ARTDOC) चे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) प्रमुख होते, त्यांची चीफ ऑफ जनरल स्टाफ (CGS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते लेफ्टनंट जनरल मिजानुर रहमान शमीम यांची जागा घेतील, ज्यांनी अलीकडेच निवृत्तीपूर्व रजा घेतली आहे. आर्मी मुख्यालयात ब्रिगेडियर जनरल म्हणून कार्यरत असलेले मेजर जनरल कैसर राशिद चौधरी यांची डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्स (DGFI) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेजर जनरल पदावर पदोन्नतीनंतर ते ही जबाबदारी स्वीकारतील.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
