लातूर, 09 फेब्रुवारी (हिं.स.) :
चाकूर तालुक्यातील लातूर रोड परिसरात असलेल्या मतदान केंद्राजवळ एका मतदारावर हल्ला करून मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना मतदानाच्या दिवशी घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम बाबुराव पाटणे (वय ४०, व्यवसाय शेती, रा. लातूर रोड, ता. चाकूर) हे आपल्या चुलतीला मतदान केंद्र क्रमांक ९०९, ९१० व १११ येथे मतदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करत होते. याच वेळी काही आरोपींनी गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यातील एका व्यक्तीने अंगावर धावून येत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर इतरांनी संगनमताने शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, “पुन्हा येथे दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर चाकूर पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश मरपल्ले करीत आहेत.
———————
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis
