बीड, 03 फेब्रुवारी, (हिं.स.)अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. एका पतसंस्थेविरुद्धच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी संबंधित संस्थेच्या सचिवाकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना ही मोठी कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पतसंस्थेच्या विरोधात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी पतसंस्थेच्या सचिवांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या एकूण ५० हजार रुपयांपैकी २५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणातील अधिक तपशील तपासानंतर समोर येईल असे पथकाकडून सांगण्यात आले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis
