परभणी, 01 फेब्रुवारी (हिं.स.)।
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सेलूचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अवैध रेती उत्खनन, चोरटी दारूविक्री आणी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एकूण सहा गुंडप्रवृत्तीच्या इसमांना परभणी व जालना जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपारीचे आदेश काढण्यात आले.
यामध्ये गोपाळ प्रकाश पांढरे रा. वालुर ता. सेलू – अवैध वाळू चोरीप्रकरणी सेलू पोलीस स्टेशनमध्ये ३ गुन्हे दाखल.
रामचंद्र ऊर्फ बबन तालेराव छुळगुंडे रा. वालुर ता. सेलू अवैध वाळू चोरी, नशा करणे व खुनाचा प्रयत्न; एकूण ०५ गुन्हे दाखल. नागेश मधुकर साबळे रा. करडगाव ता. सेलू अवैध वाळू चोरी व नशा करणे; एकूण ३ गुन्हे दाखल. प्रतिक देवराव निकाळजे रा. गायत्री नगर, सेलू अवैध दारू विक्री व दहशत निर्माण करणे; एकूण ०३ गुन्हे दाखल.
गजानन भगवानराव मोगल रा. नागठाणा ता. सेलू अवैध दारू विक्री, नशा करणे व खुनाचा प्रयत्न; सेलू येथे ७ व चारठाणा येथे ३ असे एकूण १० गुन्हे दाखल. अभिमान रमेश खाडे रा. सेलू अवैध वाळू चोरी, नशा करणे व खुनाचा प्रयत्न; एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी जिंतूर तालुक्यातील बोरी, चारठाणा, जिंतूर व सेलू पोलिस हद्दीत मागील महिन्यांत सहा गुंडप्रवृत्तीच्या इसमांना हद्दपार करण्यात आले होते. सद्यस्थितीत प्राप्त प्रस्तावांची सखोल चौकशी करून ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व चोरटी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
