रत्नागिरी, 23 जानेवारी, (हिं. स.) : आर्ट सर्कल फाउंडेशनच्या संगीत महोत्सवामुळे पौषाची थंडी आणि शास्त्रीय संगीताचे स्वर्गीय सूर यांचे नाते रत्नागिरीकरांसाठी गेल्या १८ वर्षांत दृढ झाले आहे. यंदाचा हा महोत्सव दिनांक २४, २५ आणि २६ जानेवारी या तीन दिवसांमध्ये होणार आहे. यंदा महोत्सवात युवा पिढीतील आश्वासक कलाकार आणि तपस्वी बुजुर्ग कलाकार यांची मांदियाळी असणार आहे.
यंदाचे वर्ष पंडित के. जी. गिंडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. दिनांक २६ डिसेंबरपासून जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. आग्रा घराण्याचे थोर गायक असलेले संगीत विचारवंत पंडित गिंडे यांनी आय टी सी संगीत रिसर्च अकादमी मध्ये मोलाचे योगदान दिले आहे. गुरु-शिष्य पद्धतीच्या शिक्षणाला शिस्तबद्ध आणि संस्थात्मक रूप दिले. सांस्कृतिक दस्तऐवजीकरणामध्ये त्यांनी अनमोल काम केले. त्यांच्या या प्रवासाला आणि शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाला आर्ट सर्कल हा महोत्सव अर्पण करणार आहे.
रत्नागिरीचे दोन गुणी वादक कलाकार, अर्थात पखवाज वादक प्रथमेश तारळकर आणि तबला वादक अथर्व आठल्ये या दोघांच्या सहवादनाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवसाच्या समारोपात शास्त्रीय गायक ओंकार दादरकर. वारसा हक्काने मिळालेली सुरांची देणगी त्यांनी प्राणपणाने जपली आहे. आजोबा नाटककार विद्याधर गोखले, वडील श्रीकांत दादरकर, आई शुभदा दादरकर, आत्या माणिक वर्मा अशा कलाकार कुटुंबियांच्या गोतावळ्यात ओंकार यांनी आपली स्वतंत्र प्रतिभा सिद्ध केली आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक ओंकार यांना वाद्य साथ करणार आहेत रत्नागिरीतील गुणी कलाकार. तबला साथ अथर्व आठल्ये आणि संवादिनी साथ वरद सोहनी करणार आहेत. प्रथमेश, अथर्व आणि वरद या रत्नागिरीच्या तीन्ही कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करत मान्यवरांची दाद मिळवली आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या तिन्ही कलाकारांची मंचावरील उपस्थिती हा एक सुवर्णयोग आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा प्रारंभ वहाणे भगिनींच्या वाद्यसंगीताने होणार आहे. उज्जैन (मध्य प्रदेश) येथील संगीतज्ञ डॉ. लोकेश वाहाणे यांच्या संस्कृती आणि प्रकृती या दोन कन्यांनी लहान वयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. एकीने उस्ताद शहीद परवेझ यांच्या मार्गदर्शनाखाली सतार वादनात प्राविण्य मिळवले तर प्रकृती यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संतूर वादनात आपले कौशल्य वृद्धिंगत केले. त्यांना पंडित योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव तबला साथ करणार आहेत. या दोघींच्या सादरीकरणानंतर दुसऱ्या दिवसाचा समारोप गायिका श्रुती विश्वकर्मा मराठे करणार आहेत. संगीताच्या संपन्न परंपरेतून आलेल्या श्रुती किराणा घराण्याच्या गायिका आहेत. विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचे अनमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत आणि इतर गीतप्रकार श्रुती अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तितक्याच कलात्मकतेने सादर करतात. यशवंत वैष्णव त्यांना तबला साथ करणार आहेत.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवसाची सुरुवात जयपूर येथील तरुण शास्त्रीय गायक मोहम्मद अमान खान. करणार आहेत. आजोबा उस्ताद अमीर मोहम्मद खान यांच्याकडून मिळालेली घराणेदार गायकी मोहम्मद अमान यांनी प्रवाहित ठेवली आहे. मोहम्मद शोएब तबला साथ तर पंडित अजय जोगळेकर संवादिनी साथ करणार आहेत. महोत्सवाचा समारोप करताना शास्त्रीय संगीतातील अध्वर्यू विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे. करणार आहेत. जयपूर- अत्रौली- मेवाती आणि पतियाळा घराण्याच्या गायकीच्या प्रभावातून अश्विनी यांनी स्वतःची गायकी विकसित केली आहे. स्वरांच्या सखोल अभ्यासप्रमाणे सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी तर भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैव रसायनशास्त्रातून पी एच डी मिळवली आहे. अश्विनी यांना साथ संगत करणार आहेत संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर आणि तबला साथ तनय रेगे करणार आहेत. कंठ संगीत आणि वाद्य संगीत यांनी सजलेला हा महोत्सव दरवर्षीप्रमाणे भव्य स्वरूपात साकारणार आहे.
रसिकांनी यंदाही संगीत महोत्सवाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा असे आवाहन आर्ट सर्कलकडून करण्यात आले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी
