बीजिंग , 05 जानेवारी (हिं.स.)।व्हेनेझुएलावर करण्यात आलेल्या लष्करी कारवाईविरोधात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेवर तीव्र टीका केली आहे. कोणत्याही देशाचे नाव न घेता, शी जिनपिंग यांनी अमेरिकेवर निशाणा साधत महत्त्वाचा इशाराही दिला. त्यांनी म्हटले की, जागतिक स्तरावरील प्रमुख शक्तींनी इतर देशांच्या विकासाच्या मार्गाचा आदर करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. सोमवारी आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान शी जिनपिंग यांनी ही टिप्पणी केली.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात शी जिनपिंग म्हणाले की, “आजचे जग एका शतकातील अभूतपूर्व बदल आणि अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे. एकतर्फी आणि दादागिरीच्या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्था गंभीरपणे कमकुवत होत आहे.” निवेदनात पुढे शी जिनपिंग यांनी सांगितले, “सर्व देशांनी इतर राष्ट्रांतील जनतेने स्वेच्छेने निवडलेल्या विकास मार्गांचा आदर केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत नमूद केलेल्या उद्दिष्टे आणि तत्त्वांचे पालन झाले पाहिजे. विशेषतः जागतिक स्तरावरील मोठ्या शक्तींनी या बाबतीत नेतृत्वाची भूमिका घ्यावी.”
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने लष्करी कारवाई केल्यानंतर अवघ्या काही तासांतच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. एका सार्वभौम देशाविरुद्ध उघडपणे बळाचा वापर करण्यात आल्याने आणि तेथील राष्ट्राध्यक्षांविरोधात कारवाई केल्याने चीन अत्यंत स्तब्ध असल्याचे सांगत, या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला होता.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले होते की,“अमेरिकेच्या वर्चस्ववादी कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्यांचे तसेच व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन करतात. यामुळे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रातील शांतता व सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.” तसेच, अमेरिकेने निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला जबरदस्तीने देशाबाहेर नेल्याबद्दल चीनने तीव्र चिंता व्यक्त केली असून, त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.
व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार असलेल्या चीनने वारंवार असे सांगितले आहे की, व्हेनेझुएलाला कोणत्याही बाह्य दबावाशिवाय इतर देशांशी आर्थिक सहकार्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात शी जिनपिंग यांनी चीन आणि व्हेनेझुएलाला “घनिष्ठ मित्र, प्रिय बंधू आणि विश्वासू भागीदार” असे संबोधले होते.त्या संदेशात काराकासच्या सार्वभौमत्वाचे, राष्ट्रीय सुरक्षेचे, राष्ट्राच्या सन्मानाचे आणि सामाजिक स्थैर्याचे संरक्षण करण्यासाठी चीन आपला पाठिंबा कायम ठेवेल, असा संकल्पही व्यक्त करण्यात आला होता.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
