मुंबई, 24 ऑक्टोबर (हिं.स.) – जाहिरात गुरू पद्मश्री पियुष पांडे यांचे आज, शुक्रवारी मुंबईत निधन झाले. त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पियुष पांडे यांनी अजरामर जाहिराती तसेच “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गाणे लिहिले आहे. त्यांच्या निधनाचे कारण स्पष्ट नाही. पियुष पांडे यांनी 2014 मध्ये भाजपाचे घोषवाक्य “अबकी बार, मोदी सरकार” देखील तयार केले होते. पल्स पोलिओ जाहिरात “दो बूंदे जिंदगी की”, ‘हमारा बजाज’ टॅगलाइनचे जनक ते होते.
पियुष 27व्या वर्षी जाहिरात जगतात सामील झाले. भाऊ प्रसून पांडे यांच्याकडून त्यांनी याची सुरुवात केली. दोघांनीही दररोजच्या उत्पादनांसाठी रेडिओ जिंगल्समध्ये आवाज दिला. 2016 मध्ये भारत सरकारने पीयूषला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर 2024 मध्ये त्यांना एलआयए लेजेंड पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये, पांडे आणि भाऊ चित्रपट निर्माते प्रसून पांडे, कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटीमध्ये प्रतिष्ठित लायन ऑफ सेंट मार्क मिळवणारे पहिले आशियाई बनले होते.भारतीय कथाकथनाला जागतिक उंचीवर नेणाऱ्या त्यांच्या आयुष्यभराच्या कामाची पावती त्यातून त्यांनी मिळवली.
उद्योजक सोहेल सेठ यांनी पांडे यांच्या निधनाची पुष्टी केली. त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि एका पोस्टमध्ये लिहिले की, त्यांच्या प्रिय मित्राच्या, पियुष पांडेसारख्या प्रतिभावान व्यक्तीच्या निधनाने त्यांना खूप दुःख झाले आहे आणि त्यांचे मन दुखावले आहे. त्यांच्या निधनाने ते खूप निराश झाले आहेत. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, भारताने केवळ एक महान जाहिरात उद्योजकच नाही तर एक खरा देशभक्त आणि खरोखरच एक अद्भुत माणूसही गमावला आहे.
पियुष पांडे हे मूळचे राजस्थानातील जयपूरचे होते. त्यांचा जन्म १९५५ मध्ये झाला. ते नऊ भावंडांपैकी एक होते. त्यांना सात बहिणी आणि दोन भाऊ होते. पियुष यांचे वडील बँकेत काम करत होते. पियुष यांनी अनेक वर्षे क्रिकेट खेळणार घालवली. त्यांना भारतातील भाषा आणि परंपरांची सखोल समज होती. त्यामुळेच त्यांच्या अनेक कॅम्पेन लोकांच्या मनाला भिडल्या. प्रोडक्ट लोकप्रिय होत असताना, त्यांनी तयार केलेल्या जाहिरातींनीही खूप लक्ष वेधले आणि लोक त्या मोठ्या आवडीने पाहत राहिले.
पियुष पांडे यांनी ८०-९० च्या दशकात जाहिरात क्षेत्रात क्रांती घडवली होती. त्यांनी पारंपरिक जाहिरातीपासून फारकत घेत माहितीपूर्ण व संवेदनशील वैविध्यपूर्ण जाहिराती अँड एजन्सीमार्फत बनवल्या.करमणूकीत संदेश देताना लक्षात राहतील अशा जाहिराती बनवणे हा त्यांचा लौकिक होता. Ohilvy India या जाहिरात एजन्सीमार्फत त्यांनी चार दशके जाहिरात व मल्टीमिडिया क्षेत्रात आपले अधिराज्य गाजवले होते. क्रिकेटपटू, चहाचा स्वाद घेणारे आणि बांधकाम कामगार म्हणून काही काळ काम केल्यानंतर पांडे १९८-२ मध्ये ओगिल्वीमध्ये (Ogilvy India) रूजू झाले होते. त्यांच्या प्रसिद्ध जाहिरातीपैकी एशियन पेंट्स (हर खुशी में रंग लाये), कॅडबरी (कुछ खास है), फेविकॉल आणि हच सारख्या ब्रँडसाठी केलेल्या जाहिरातीतून सामाजिक संदर्भ लक्षात घेता ते सांस्कृतिक परिवर्तन ते त्यांनी जाहिरातीतून दर्शविले होते. २०२३ मध्ये सल्लागार भूमिका घेण्यासाठी ओगिल्वी इंडियाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
