अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या झायलो कार चोरी प्रकरणाचा तपास डीबी पथकाने अल्पावधीत उघडकीस आणला. या कारवाईत आरोपीला ताब्यात घेत चोरी गेलेली गाडी जप्त करण्यात आली आहे.
फिर्यादी प्रवीण सुभाषराव निस्ताने (वय 49, रा. धामणगाव ह.मु. केवल कॉलनी, अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची झायलो कार (क्र. MH-43-BA-1009, किंमत सुमारे रु. 1,30,000) घरासमोर उभी केली होती. 16 सप्टेंबर रोजी ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. 19 सप्टेंबर रोजी घरी परतल्यावर गाडी चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात कलम 305 (ब), भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान डीबी पथकाने आरोपी शेख शोयब शेख जाकीर (वय 34, रा. जमीन कॉलनी, सेवादन नगर, अमरावती) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी गेलेली झायलो कार जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने संयुक्तरीत्या कारवाई केली.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
