नवी दिल्ली, २२ सप्टेंबर (हिं.स.) – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही आयसीसी अध्यक्ष जय शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीने लिहिले आहे की, आमचे अध्यक्ष जय शाह यांना त्यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन. आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात, शाह यांनी आयसीसीला पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर करण्यास, शोभा, युनिलिव्हर आणि गुगल सारखे नवीन प्रायोजक मिळविण्यात आणि तीन यशस्वी जागतिक स्पर्धांचे नेतृत्व करण्यास मदत केली आहे.
बीसीसीआयने लिहिले आहे की, आयसीसी अध्यक्ष जय शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाने एका एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, आयसीसी अध्यक्ष जय शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना आनंदी, निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी शुभेच्छा. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनी लिहिले, जय शाह, तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. खेळ पुढे नेण्यासाठी तुमचे समर्पण आणि अथक प्रयत्न येणाऱ्या पिढ्यांवर छाप सोडतील. जय शाहचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ रोजी झाला. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी २००९ मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनपासून आपला प्रवास सुरू केला. २०१९ मध्ये जय शाह यांना बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत. सध्या ते आयसीसीचे अध्यक्ष आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
