पुणे, 21 सप्टेंबर (हिं.स.)। एका महिलेने काॅफीच्या पाकिटातून अमली पदार्थ तस्करी केल्याचा प्रकार सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने उघडकीस आणला. बँकॉकहून काॅफीच्या पाकिटातून आणलेले पाच किलो मेथोक्वालोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबईतील एका महिलेला अटक करण्यात आली.
जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत दोन कोटी ६१ लाख रुपये इतकी किंमत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. फहेमिदा मोहम्मद साहिद अली खान (४४, नयानगर, रहेजा हॉस्पिटल मार्ग, माहीम पश्चिम, मुुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सीमाशुल्क विभागाच्या निरीक्षक पलक यादव यांनी फिर्याद दिली आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून आलेले विमान पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्या वेळी फहेमिदा खान विमानतळाच्या आवरातून गडबडीत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात हाेती. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने तिच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पथकातील अधिकाऱ्यांनी तिच्याकडील सामानाची तपासणी केली. बॅगेत कपडे, चाॅकलेट, काॅफीची पाकिटे सापडली.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
