अनिल कपूर, करीना कपूर, प्रियंका चोप्रा आणि अनुराग कश्यप ही झाले भावूक
लॉस एंजेलिस, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। ऑस्कर विजेते दिग्दर्शक आणि हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पब्लिसिटी फर्म रॉजर्स अँड कोवन पीएमकेच्या सीईओ सिंडी बर्गर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. मात्र, मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
रेडफोर्ड यांच्या निधनानंतर हॉलीवूडसह त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमेरिकन अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती जेन फोंडा यांनी म्हटलं, आज सकाळी जेव्हा मला समजलं की बॉब (रॉबर्ट रेडफोर्ड) आपल्यात नाहीत, तेव्हा मी हादरले. मी रडणं थांबवू शकले नाही. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. ते एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं की, रॉबर्ट रेडफोर्ड हे उत्तम अभिनेते होते. काही वर्षे अशी होती, जेव्हा त्यांच्यापेक्षा मोठं नाव कुणाचं नव्हतं.
रेडफोर्ड यांच्या निधनाने बॉलिवूडही भावुक झालं. अनिल कपूर, करीना कपूर, प्रियंका चोप्रा आणि अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली दिली.
रेडफोर्ड यांचा समावेश हॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांमध्ये केला जातो. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘बुच कॅसिडी अँड द सनडान्स किड’ (1969), ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ (1976), ‘थ्री डेज ऑफ द कोंडोर’ (1975) यांचा समावेश होतो. ‘बुच कॅसिडी अँड द सनडान्स किड’मध्ये त्यांनी जुन्या वेस्टर्न काळातील भूमिका केली होती, तर ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ मध्ये त्यांनी पत्रकार बॉब वूडवर्डची भूमिका साकारली होती. ‘द स्टिंग’ (1973) या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं.
वयाच्या चाळिशीनंतर त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकलं. त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘ऑर्डिनरी पीपल’ (1980) हा एका कुटुंबाची कथा सांगणारा होता. या चित्रपटाने चार ऑस्कर पुरस्कार जिंकले, ज्यात बेस्ट पिक्चर आणि बेस्ट डायरेक्टर यांचा समावेश होता.
त्यानंतर त्यांनी ‘अ रिव्हर रन्स थ्रू इट’ (1992) आणि ‘क्विझ शो’ (1994) यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले. ‘क्विझ शो’ला बेस्ट पिक्चर आणि बेस्ट डायरेक्टरसह चार ऑस्कर नामांकनं मिळाली होती.
रेडफोर्ड फक्त अभिनेता आणि दिग्दर्शकच नव्हते, तर ते सनडान्स फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक होते. या फेस्टिव्हलने जगभरातील स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
