पुणे, 11 सप्टेंबर, (हिं.स.)। बारामती तालुक्यातील पारवडी गावातील इंगळे वस्तीवर जागेच्या किरकोळ वादातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या मालकीच्या जागेत बाथरूम बांधण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणात काका आणि त्याच्या मुलाने युवकाला जबर मारहाण केल्याने त्याचा जीव गेला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास घडली.
मृत युवकाचे नाव सौरभ विष्णू इंगळे (वय २४) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या जागेत बाथरूम बांधले असल्याचा दावा करत सौरभने, प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे यांना जाब विचारला. यावरून तिघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला, या दरम्यान प्रमोद आणि रामचंद्र यांनी सौरभला बेदम मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर सौरभच्या चुलत भावांनी त्याला तातडीने बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
