मुंबई, ६ सप्टेंबर (हिं.स.). ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. हे सामने १६ सप्टेंबरपासून लखनऊमध्ये खेळवले जाणार आहेत.
संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर यष्टीरक्षक ध्रुव जुरेल उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या संघात साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे क्रिकेटपटूदेखील आहेत. या क्रिकेटपटूंनी अलीकडेच इंग्लंडमध्ये संपलेली पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली होती.केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना दुसऱ्या सामन्यात संघात स्थान देण्यात येणार आहे. आणि ते पहिल्या सामन्यानंतर दोन क्रिकेटपटूंची जागा घेणार आहेत. दुसरा सामना २३ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे.
भारतीय कसोटी संघाच्या जवळ असलेले पण अद्याप पदार्पण केलेले नसलेले अभिमन्यू ईश्वरन, तनुश कोटियन आणि एन. जगदीसन सारख्या क्रिकेटपटूंसाठी देखील ही मालिका महत्त्वाची असणार आहे. देवदत्त पडिकल देखील कसोटी संघात परतण्यासाठी या संधीचा फायदा घेण्यास प्रयत्नशील आहे. पडिकलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आणि आतापर्यंत त्याच्याकडे फक्त दोन कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. ही मालिका ११ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर खेळली जाईल. आणि २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्याच्या तयारीच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरेल. या दोन सामन्यांनंतर कानपूरमध्ये ३० सप्टेंबर, ३ आणि ५ ऑक्टोबर रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
