सोलापूर, 6 सप्टेंबर (हिं.स.)।
होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यापासून सोलापूर-मुंबई विमानसेवेची चर्चा सुरू आहे. पण मुंबई व पुणे विमानतळावर गैरसोयीचे स्लॉट (विमान उतरण्याची वेळ) मिळाल्याने विमानसेवा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या चार दिवशी दुपारी २ वाजता तर पुणे विमानतळावर पहाटे २ वाजता विमान उतरण्यास परवानगी मिळाली आहे. ही वेळ सोलापूरकरांसाठी गैरसोयीची आहे. आता मुंबई व पुणे या दोन्ही विमानतळावरील स्लॉट बदलून देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली आहे.
सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्यापासून मुंबईसाठी कधी विमानसेवा सुरू होणार याची चर्चा होती. स्टार कंपनीस सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. पण मुंबई विमानतळावर आठवड्यातील चार दिवसांसाठी स्लॉट उपलब्ध झाला आहे. पण तो सोलापूरकरांसाठी गैरसोयीचा आहे. यामुळे विमानसेवा देणारी कंपनीकडून स्लॉट बदलून मिळण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने सात दिवस सेवा देण्यास परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात चारच दिवस स्लॉट मिळाला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
