मुंबई, 1 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. सोन्याप्रमाणेच आता (आज) १ सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंग केली आहे. गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने ही पायरी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून यामुळे दागिने खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल.
हॉलमार्किंग म्हणजे दागिन्यांमध्ये वापरलेल्या धातूची शुद्धता आणि प्रामाणिकतेची हमी देणारी प्रक्रिया. चांदीच्या दागिन्यांमध्ये नेमकी किती शुद्धता आहे हे सिद्ध करण्यासाठी हॉलमार्क महत्त्वाची भूमिका बजावतो. आजवर अनेकदा ग्राहकांना शुद्धतेबाबत शंका निर्माण होत असत, परंतु या नवीन निर्णयामुळे आता ते अधिक आत्मविश्वासाने दागिने खरेदी करू शकतील.
सुरुवातीला या हॉलमार्किंगची अंमलबजावणी ऐच्छिक स्वरूपात केली जाणार आहे. म्हणजेच १ सप्टेंबरपासून कोणत्याही ग्राहकाला हवे असल्यास तो हॉलमार्क केलेले चांदीचे दागिने खरेदी करू शकेल. अगदी सुरुवातीला सोन्यासाठी जसे ऐच्छिक हॉलमार्किंग सुरु करण्यात आले होते त्याच धर्तीवर चांदीसाठीही हे धोरण लागू केले जात आहे.
बीआयएसने चांदीच्या दागिन्यांसाठी सहा शुद्धता ग्रेड निश्चित केल्या आहेत. त्या अनुक्रमे ८००, ८३५, ९००, ९२५, ९७० आणि ९९० अशा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे व बजेटनुसार शुद्धतेच्या विविध श्रेणीतील दागिने खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या शुद्धता श्रेणी मान्यताप्राप्त आहेत.
हॉलमार्किंग प्रक्रियेत प्रत्येक दागिन्याला ६ अंकी एचयूआयडी म्हणजेच हॉलमार्क युनिक आयडी दिला जाईल. हा आयडी त्या दागिन्याची प्रामाणिकता, शुद्धता आणि नोंदणी यांचे प्रमाणपत्र असेल. ग्राहकांना हा एचयूआयडी नंबर तपासून खरेदी केलेल्या दागिन्यांची खरी-खोटी सहज कळू शकेल.
ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्वाचा आहे. बीआयएसने ग्राहकांसाठी ‘बीआयएस केअर’ हे अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्यामधील ‘व्हेरिफाय एचयूआयडी’ या विशेष सुविधेमुळे कोणतेही दागिने खरेदी करताना त्यावरील एचयूआयडी नंबर टाकून त्या दागिन्यांची शुद्धता व प्रमाणिकता त्वरित तपासता येईल. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल.
या निर्णयामुळे केवळ ग्राहकांनाच नाही तर दागिने उद्योगालाही फायदा होईल. कारण हॉलमार्किंगमुळे बाजारातील विश्वासार्हता वाढेल आणि शुद्धतेबाबतच्या वादांनाही आळा बसेल. एकंदरित, बीआयएस ने उचललेले हे पाऊल दागिने उद्योगाला नवी दिशा देणारे ठरेल असे मानले जात आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
