रायपूर, 30 ऑगस्ट (हिं.स.) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलीस ठाणे क्षेत्रातील तोडका गावात नक्षलवाद्यांनी शिक्षादूताची निर्दयपणे हत्या केली. मृत शिक्षादूताची ओळख 25 वर्षीय कल्लू ताती अशी झाली असून तो तोडकाचाच रहिवासी होता.
कल्लू ताती गंगालूर परिसरातील नेड्रा शाळेत पदस्थ होता. माहितीप्रमाणे, शुक्रवारी संध्याकाळी शाळेतून परत येत असताना नक्षलवाद्यांनी त्याचे अपहरण केले आणि मध्यरात्री त्याला ठार मारले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तपासासाठी रवाना झाले असून घटनास्थळी पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.बस्तर विभागातील दुर्गम व नक्षल प्रभावित भागात दीर्घकाळ शाळा बंद होत्या. अशा परिस्थितीत शासनाने स्थानिक तरुणांना शिक्षादूत म्हणून नेमून शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांमध्ये शिक्षणाची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली असून मुले शाळेत जाऊ लागली आहेत.तथापि, बंद शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत नक्षलींनी या जिल्ह्यात पाच शिक्षादूतांची हत्या केली आहे. बीजापूर आणि सुकमा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून नऊ शिक्षादूतांचा बळी घेतला गेला आहे. नक्षलवाद्यांना शंका असते की शिक्षादूत पोलीसांना माहिती पुरवतात. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ते अशा शिक्षादूतांची हत्या करतात.
—————————–
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी
