वणी, 7 ऑगस्ट, (हिं.स.)। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठवणूक केलेला ७३ हजाराचा गांजा व ८ हजाराचा मोबाईल असा एकूण ८१ हजाराचा ऐवज जप्त करुन संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वणी पोलिस ठाणे हद्दीतील मुळाणे येथील संशयीताकडे गांजा या अंमली पदार्थाचा साठा असल्याची गोपनीय माहीती सपोनी गायत्री जाधव यांना मिळाली.
प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने मुळाणे शिवारात कांतीलाल पांडू पालवी यास संशयावरुन ताब्यात घेतले व झडती घेतली असता पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची गोणी आढळली. त्यात गांजा सदृष्य वनस्पती त्यास फांद्या, पान, बिया फुले व बोंडे असलेला सुका गांजा प्रतिकिलो वीस हजार रुपये एकूण ३,६५० ग्रॅम किम्मत ७३,००० व ८ हजाराचा भ्रमणध्वनी असा एकूण ८१ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापार परीणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्यान्वये संशयित कांतीलाल पालवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
