वॉशिंग्टन, 4 ऑगस्ट (हिं.स.)
तिसऱ्या
टी-२० सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा १३ धावांनी पराभव केला. या विजयासह
पाकिस्तानने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. पहिला सामना पाकिस्तानने
१४ धावांनी जिंकला आणि दुसरा टी-२० सामना वेस्ट इंडिजने दोन विकेट्सने जिंकला होता.
तिसऱ्या टी-२० मध्ये शाहिबजादा फरहानला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले. तर
अष्टपैलू मोहम्मद नवाज मालिकावीर ठरला. १९० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर
देताना वेस्ट इंडिजचा संघ २० षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १७६ धावाच करू
शकला.
पाकिस्तानने
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिबजादा फरहान आणि सॅम
अयुब यांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. फरहानने ५३ चेंडूत तीन
चौकार आणि पाच षटकारांसह ७४ धावा केल्या. त्याच वेळी, सॅम अयुबने ४९ चेंडूत चार चौकार आणि
दोन षटकारांसह ६६ धावा केल्या. हसन नवाजने सात चेंडूत दोन षटकारांसह १५ धावा
केल्या आणि मोहम्मद हरिसने दोन धावा केल्या. खुशदिल शाह ११ धावांवर आणि फहीम आश्रम
१० धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, रोस्टन चेस आणि शमर जोसेफ यांनी
प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
टी-२०
मालिकेनंतर आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार
आहे. तिन्ही सामने त्रिनिदादमध्ये खेळवले जाणार आहेत. पहिला एकदिवसीय सामना ८
ऑगस्ट रोजी, दुसरा एकदिवसीय सामना १० ऑगस्ट रोजी
आणि तिसरा एकदिवसीय सामना १२ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
