अकोला, 29 जुलै (हिं.स.)। विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या अंगरक्षकावर हल्ला करणाऱ्या आरोपीला विद्यमान तिसऱ्या न्यायाधीश जमाईवार यांच्या न्यायालयाने जामीन दिला आहे़
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित खडकी मध्ये एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी गेले असताना तेथे आरोपी विजय दिगंबर वाकोडे यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अडथळा आणून अंगरक्षकाला शिवीगाळ करत त्याच्यावर ढाबा बोलला होता . सदर अंगरक्षक आणि आरोपी यांच्यामध्ये हातापायी होऊन हाणामारी झाली होती . त्यानंतर आमदार मिटकरी यांनी खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांना फोन करून सदर आरोपी विरुद्ध तक्रार देऊन गुन्हा दाखल करायला लावला होता . यामध्ये फिर्यादी अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल फिरोज बेनीवाले यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बी एन एस चे कलम ३५२, १२१(१), १३२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी वाकोडे याला अटक केली होती . लोकप्रतिनिधीच्या अंगरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती . या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप मोठी धुसमूस होती . सदर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अमोल चक्रे यांनी युक्तिवाद करून आरोपीच्या जामीनाबद्दल आपली बाजू मांडत न्यायालयात युक्तीवाद केला . सदर युक्तीवादाला ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची जामीनावर सुटका केली.
—————
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे
