डोंबिवली, 25 जुलै (हिं.स.)
संस्कृती मंत्रालय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या मुंबई महोत्सव २०२५ मध्ये भरतनाट्यम नृत्य स्पर्धेत डोंबिवलीच्या श्रावणी संतोष आसई हिला प्रथम क्रमांक मिळाला असून तिला कला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माटुंगा कल्चरल सेंटर येथे संपन्न झालेल्या भरतनाट्यम नृत्य स्पर्धेत एकूण ७५ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेले होते. या स्पर्धेत डोंबिवलीच्या श्रावणी संतोष आसई हिला प्रथम क्रमांक मिळाला असून तिला कला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नृत्यातील श्रावणीचे मोहक पदन्यास, चेह-यावरील अनुपमेय हावभाव व कमालीची लवचिकता यामुळे तिने रसिकांची आणि तज्ञ परिक्षकांची मने जिंकून वाहवा मिळवली.
श्रावणीने आतापर्यंत स्टेट, नॅशनल व इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेवून अनेक बक्षिसे व पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. वयाच्या ८ व्या वर्षापासून ती नृत्यगुरु सरला भगत यांच्याकडे भरतनाट्यमचे शिक्षण घेत आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या पाच परिक्षा ती सन्मानाने व विशेष नैपुण्याने उत्तीर्ण झाली असून विशारदची तयारी करीत आहे. श्रावणी यंदा १० वीत असून सेंट टेरेसा काॅन्व्हेट या शाळेत शिकत आहे. तिला वकील व्हायचे असून न्यायदानाचे पवित्र काम करायचे आहे अशी तिची ईच्छा आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi
