पिडीत कुटुंबियांचा आरोप, प्रशासनाचे प्रकरणावर मौननागपूर, 20 जुलै (हिं.स.) : राज्यभरातील परिचारिका सध्या संपावर आहेत. यामुळे नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांच्या नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकारानंतर रुग्णालयातून बाळाच्या उपचाराची फाईल गहाळ झाल्याची माहिती बाळाचे वडील चेतन बोरकर यांनी दिली. दरम्यान या प्रकरणावर मेडकल कॉलेज प्रशासनाकडून काहीच खुलासा झालेला नाही.
नागपुरातील नवीन बाभुळखेडा परिसरातील चेतन बोरकर हे पेंटींग आणि मजुरीची कामे करतात. त्यांना लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी 16 जुलै रोजी त्यांची पत्नी नंदा बोरकर हिचे सायंकाळी 5.30 वाजता सिझरिन करण्यात आले. बाळ नाजुक असल्याने त्याला काचेच्या पेटीत 3 तास ठेवण्यात आले. नंतर 16 जुलै रोजीच रात्री 8.30 वाजताच्या सुमारास बाळाला आईजवळ देण्यात आले. दुसऱ्या दिवशी अंगणवाडी सेविका बाळाला पाहण्यासाठी आली. बाळाची प्रकृती नाजुक आहे. त्यामुळे त्याला लागलीच लस वगैरे देऊ नका. कारण ते झेपणार नाही, असे तिने सांगितल्याची माहिती बोरकर यांनी दिली. बोरकर यांच्या सांगण्या नुसार वॉर्ड क्र. 28 मध्ये त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. एकूण 40 खाटांच्या या वॉर्डात प्रशिक्षित परिचारिका असतात. परंतु संपामुळे एक अप्रशिक्षित ब्रदर ड्युटीवर होता.
त्यानंतर 18 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास एक परिचारिका बाळाला लस देण्यासाठी आली असता बाळाच्या आईने लस देऊ नका असे सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत परिचारिकेने लस दिली. त्या नंतर बाळाने उचकी देण्यास सुरूवात केली. घाबरण्याचे काही कारण नाही. बाळाला झोपु द्या आणि एक दीड तासाने दुध पाजा’, असे सांगून नर्स निघून गेली. एका तासानंतर आईने बाळाला दुध पाजण्यासाठी उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. तसेच बाळाचे शरीर निळे पडले होते.
अन्ननलिकेत दुध अडकल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे हॉक्टरांचे म्हणणे होते. मात्र, त्यामुळे शरीर निळे पडत नाही, असे बोरकर म्हणाले. आम्ही उपचाराची कागदपत्रे मागितली असता तीही दिली नाही. बाळाचा रंग निळा पडलेला पाहून आईने ड्युटीवरील ब्रदरला आवाज दिला. ब्रदरने घाबरून बाळाला बालरोग विभागातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षाकडे नेले. तेथील डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली. तोपर्यत उशिर झाला होता. येथे आणण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवजात बाळाच्या उपचाराची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. बाळाच्या वडिलांनी इवल्याशा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार देत मृत बाळाला घरी नेले. तसेच 18 जुलै रोजी संध्याकाळी बाळाच्या मृतदेहावर अत्यसंस्कार केल्याचे बाळाचे वडील चेतन बोरकर यांनी सांगितले.
मेडिकलमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, लातुर तसेच महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन अशा दोन संघटना आहे. मेडिकलमध्ये एकूण 1300 परिचारिका आहे. यापैकी परिचारिका संघटना, लातुरचे सुमारे 800 सदस्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्र नर्सेस फेडरेशचे काही सदस्य ड्युटीवर आहे. मात्र बाळाच्या मृत्यूचे खापर अकारण परिचारिकांच्या संपावर फोडण्यात येत असल्याचे संघटनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राज गजभिये यांच्यासह विविध अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
———————–
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे
