पुणे, 2 जुलै, (हिं.स.)। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रभाग रचना (गट, गण) करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि आरक्षणाचे निकष लक्षात घेऊन प्रारूप आराखड्याचे काम सुरू केले आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा १४ जुलै रोजी पूर्ण करून तो तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाला देणार आहेत. त्याप्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचना करण्याचे काम राज्य सरकारच्या सूचनेनुसार सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचा आदेश देण्यात आला. राज्य सरकारच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या गट, गण रचना करण्याचा आदेश दिला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संबंधित भागातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि आरक्षणाचे निकष लक्षात घेऊन प्रारूप आराखड्याचे काम सुरू केले आहे. प्रारूप प्रभाग आराखडा जिल्हा प्रशासनाकडे आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डसह संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती आणि सूचना सादर करता येणार आहे. हरकतींच्या आधारे जिल्हाधिकारी अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करतील. यानंतर ११ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणार आहेत. यानंतर जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवणार आहेत. दरम्यान, तहसीलदारांकडून जिल्हा प्रशासनाला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा १४ जुलै रोजी पाठविण्यात येईल. त्यानंतर या आराखड्याची तपासणी करून दुरुस्ती करण्यात येईल. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
