पुणे, 30 जून (हिं.स.)।
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीच्या उत्पन्नात एकीकडे घट होत असल्याची सार्वत्रिक ओरड ऐकावयास येत असताना दुसऱ्या बाजूला एसटीच्या पुणे विभागाने मे महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत सहा कोटी ३० लाखांचे अधिक उत्पन्न मिळवले आहे. मे महिन्यात पुणे एसटी विभागाचे उत्पन्न सर्वाधिक आहे.
एसटीच्या प्रवासी वाहतूक नियमानुसार यंदा पुणे विभागाला जवळपास चार कोटींचा नफा झाला आहे. शहरातून गावखेड्यांसह जिल्हे आणि राज्याच्या डोंगरकपारीत जाणारी एसटी सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी महिला आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिली. यामुळे एसटी महामंडळाने चाक तोट्यात अधिक रुतले अशी टीका होत होती. मात्र, या सवलतींमुळे एसटीचे भारमान वाढून मोकळ्या फिरणाऱ्या एसटीला महिला, ज्येष्ठ प्राधान्य देऊ लागले. परिणामी प्रवासी संख्या वाढण्याबरोबर उत्पन्नातही सुधारणा झाली.
गेल्या वर्षी मे महिन्यात पुणे एसटी विभागातून एकूण ६५ लाख २७ हजार नागरिकांनी प्रवास केला. त्यातून ५६ कोटी ४३ लाख ५६ हजार इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली असून ६४ लाख ५४ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून ६२ कोटी ७२ लाख २२ हजार इतका महसूल मिळाला आहे. एसटीच्या प्रवासी वाहतूक नियमानुसार यंदा ३ कोटी ९६ लाख म्हणजे जवळपास चार कोटींचा नफा झाला आहे.
जानेवारी महिन्यात एसटीच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवासी घटले तरी उत्पन्नात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात ७३ हजार प्रवासी संख्येत घट झाली आहे. मात्र, उत्पन्नात सहा कोटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे तिकीट दर वाढल्याने एसटीच्या उत्पन्नात कोटीने भर पडत आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
