चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने काही मार्ग बंद झाले आहेत. मागील चार दिवसात चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती, पण मंगळवारी शहरात सायंकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. चंद्रपुरात पावसाची संततधार गुरुवारी सकाळपर्यंत कायम होती. त्यामुळे काही मार्ग बंद झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
BulletsIn
- गोंडपिपरी – पोंभुर्णा मार्ग वाढोली पुलावरून पाणी गेल्याने बंद झाला आहे.
- गोंडपीपरी तालुक्यातील कुलथा, लाठी-अर्वी व लाठी-वेजगाव मार्ग बंद झाला आहे.
- अंधारी नदीला अजयपूरजवळ पूर आल्याने चंद्रपूर-मूल-गडचिरोली मार्ग बंद झाला आहे.
- बामणी-राजुरा मार्गावर वर्धा नदीचे पाणी पुलाला टेकले आहे.
- गडचांदूर ते चंद्रपूर मार्गावरील भोयेगाव-धानोरा पुलावर पाणी आले असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- भोयेगाव जवळ ‘बॅरिकेटींग’ लावलेले आहेत व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- मागील काही दिवसांत संततधार झाल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झटपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
- नदी नाल्यांना पूर आल्याने काही नद्यातील पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
- चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
